
बिएस न्यूज नेटवर्क मुल प्रतिनिधी गणेश गेडाम. :मूल नगर परिषद प्रवेशद्वारावरील शिलालेखाची विटंबना; नगराध्यक्षांचा तीव्र निषेध, कठोर कारवाईचा इशारा मूल: येथील नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील शासकीय शिलालेखावर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारावर मूलच्या नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारी मालमत्तेची विटंबना खपवून घेतली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.या संदर्भात प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ म्हणाल्या की, “मूल शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. असे असताना सरकारी शिलालेखावर शेण फेकून सार्वजनिक मालमत्तेची विटंबना करणे हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे. हा सरकारी संपत्तीचा अपमान असून अशा कृत्यांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही.” प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी आणि दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.तसेच, स्वच्छता आणि शहराच्या विकासासारख्या महत्त्वाच्या विषयांवर राजकारण करण्याऐवजी सर्व नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सत्य समोर येण्याची प्रतीक्षा करावी, असेही त्या पुढे म्हणाल्या.या घटनेबाबत प्रशांत विलासराव समर्थ यांनीही संताप व्यक्त केला आहे. “जाणीवपूर्वक अशा घटना घडवून नगर परिषदेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. दोषी कोणीही असो, त्याला कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि सत्य जनतेसमोर आणावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.नगर परिषद शहराच्या विकास आणि स्वच्छतेसाठी सातत्याने काम करत असताना काही घटक राजकीय प्रसिद्धीसाठी किंवा वातावरण गढूळ करण्यासाठी अशा घटना घडवत असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टींना बळी न पडता सत्य आणि पुराव्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान, नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी संबंधित शिलालेखाची तत्काळ स्वच्छता करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सार्वजनिक मालमत्तेचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आणि कठोर भूमिका घेणार असून अशा कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.









