बीएस न्यूज नेटवर्क मुल संपादक प्रतिनिधी गणेश गेडाम दिनांक १२/०८/२०२६ बुधवारी नागपूर रोडवर काळाचा घाला; ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू मूल शहरातील नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिल समोर बुधवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बाप-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या अपघातात राहुल नारायण पाल (वय ३५ वर्षे) आणि त्यांची अवघी तीन वर्षांची चिमुकली मुलगी ईशा राहुल पाल यांचा मृत्यू झाला. दोघेही बाजार आटोपून दुचाकीने आपल्या बोंडाळा (भूज) गावाकडे परतत होते. दरम्यान, लक्ष्मीनारायण राईस मिल समोर समोरून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.चिमुकल्या ईशाच्या मृत्यूने हळहळअवघ्या तीन वर्षांच्या ईशाचा वडिलांसोबत झालेला दुर्दैवी मृत्यू मन हेलावून टाकणारा ठरला आहे. एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बोंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.ट्रॅक्टर चालकाबाबत पोलीस तपास सुरूया भीषण अपघाताची नेमकी कारणे तसेच ट्रॅक्टर चालकाविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई याबाबत मूल पोलीस तपास करीत आहेत. या घटनेने नागपूर रोड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सावधगिरीने वाहन चालवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









