
विटंबना खपवून घेतली जाणार नाही; दोषींवर कठोर कारवाई होणार – नगराध्यक्ष सौ. एकता प्रशांत समर्थमुल (बीएस न्यूज नेटवर्क प्रतिनिधी, गणेश गेडाम):मुल नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरील शासकीय शिलान्यासावर शेण फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत मुलच्या नगराध्यक्ष सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हे कृत्य अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा कोणताही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न न करता दोषींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.नगराध्यक्ष सौ. एकता समर्थ पुढे म्हणाल्या, “मुल शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत आहे. अशा वेळी सरकारी शिलान्यासावर शेण फेकून सार्वजनिक मालमत्तेची विटंबना करणे हा कुठलाही निषेध नोंदवण्याचा मार्ग असू शकत नाही. हा थेट सरकारी संपत्तीचा अपमान आहे आणि अशा प्रवृत्तीला कोणतेही समर्थन दिले जाऊ शकत नाही. प्रशासनामार्फत या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”तसेच, स्वच्छतेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर राजकारण करण्याऐवजी सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर किंवा अपप्रचारावर विश्वास न ठेवता सत्य समोर येण्याची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.याप्रकरणी प्रशांत विलासराव समर्थ यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “जाणीवपूर्वक अशा घटना घडवून नगर परिषदेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. दोषी व्यक्ती कोणतीही असो, तिला कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व सत्य जनतेसमोर आणावे. काहीजण राजकीय प्रसिद्धीसाठी किंवा वातावरण गढूळ करण्यासाठी अशा घटना घडवत असतील, तर नागरिकांनी त्याला बळी पडू नये व पुराव्यांवरच विश्वास ठेवावा.”दरम्यान, नगराध्यक्ष सौ. एकता समर्थ यांनी शिलान्यास परिसराची तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सार्वजनिक मालमत्तेची विटंबना करणाऱ्यांविरोधात नगर परिषद कोणतीही गय करणार नसून कठोर कारवाईवर ठाम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.






