मुल बीएस न्यूज नेटवर्क मुल संपादक गणेश गेडाम….📰 आधार कार्ड आहे, तर NCMC कार्ड कशासाठी?ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलतीसाठी पुन्हा नव्या कार्डची सक्ती; ₹१९९ शुल्क आणि बॅलन्स ठेवण्याची अट सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आधार कार्डवर जन्मतारीख नमूद असते आणि त्यावरून व्यक्तीचे वय सहज समजू शकते. असे असताना ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य का केले जात आहे?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.१ ऑक्टोबरपासून सवलतीचा प्रवास करण्यासाठी हे नवीन कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास एसटी कडून प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जाणार आहे. हे कार्ड मिळविण्यासाठी १९९ रुपये शुल्क आकारले जात आहे. मोबाईल प्रमाणे या कार्ड मध्येही बॅलन्स ठेवावा लागणार आहे. तसेच दर तीन महिन्यांनी कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.सर्व्हर डाऊन असल्यास कार्डमध्ये बॅलन्स असूनही ते काम करणार नाही. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासासाठी पूर्ण भाडे भरावे लागू शकते.एसटी बसने प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती आधीच कमकुवत आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे त्यांची आर्थिक अवस्था आणखी बिकट होत आहे. अशा परिस्थितीत सवलतीच्या दरात प्रवास करायचा असेल, तर NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.मात्र, हे कार्ड मिळवायचे कसे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. कार्ड मिळविण्यासाठी बस स्थानकांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. काही एजंट किंवा दलाल अधिक पैसे घेऊन हे कार्ड बनवून देत असल्याचा आरोपही केला जात आहे.कार्डच्या मागे कोणाचा हात?पैसे घेऊन कार्ड बनवून देण्याच्या प्रकारामागे एसटी अधिकारी-कर्मचारी आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच कार्ड बनविणाऱ्या आणि त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचा संबंध एका राजकीय नेत्याशी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.एसटी महामंडळाची भूमिका अशी आहे की, महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. सवलतीच्या दरात प्रवासाच्या योजनांमुळेही हा तोटा वाढत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एसटीला दरवर्षी होणाऱ्या सुमारे ६०० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी शुल्क आकारून NCMC कार्ड देण्याची योजना तयार करण्यात आली आहे.मात्र एसटीच्या तोट्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. खासगी बससेवांशी स्पर्धा करताना एसटीने आपल्या बसगाड्यांची स्थिती आणि सेवा अधिक चांगली ठेवणे गरजेचे आहे. जुन्या वाहनांमुळे प्रवाशांना योग्य सेवा कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.निवडणुकीच्या काळात जनतेला आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली जातात; मात्र नंतर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होते, अशी टीकाही करण्यात आली आहे.आता आधार कार्ड, मतदार कार्ड, आयुष्मान कार्ड, कृषी कार्ड अशा विविध प्रकारची अनेक कार्डे नागरिकांना सांभाळावी लागत आहेत. त्यात आता NCMC कार्ड चीही भर पडली आहे.मुख्य सवाल : आधार कार्ड वरून वयाची ओळख पटत असताना एसटी सवलतीसाठी स्वतंत्र NCMC कार्डची गरज नेमकी कशासाठी?असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे








