
धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनससाठी केविलवाणी प्रतीक्षामुल (प्रतिनिधी): खरीप हंगामात प्रचंड मेहनत करून धानाचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांची आज बोनसच्या प्रतीक्षेत केविलवाणी अवस्था झाली आहे. वाढते उत्पादन खर्च, महागलेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी व सिंचनाचा खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच धान विक्रीनंतरही बोनसची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.धान विक्रीतून मिळालेली रक्कम उत्पादन खर्च भागविण्यातच संपत असल्याने बोनस हा शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार मानला जातो. मुलांचे शिक्षण, घरखर्च, कर्जफेड तसेच आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी अनेक शेतकरी बोनसच्या रकमेवर अवलंबून आहेत. मात्र बोनस वितरणाबाबत अद्याप कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.शेतकऱ्यांनी शासनाकडे बोनसची रक्कम तातडीने जाहीर करून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. वेळेत बोनस मिळाल्यास आर्थिक ताण कमी होऊन पुढील शेतीची तयारी करणे सुलभ होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता शासनाने याप्रश्नी तातडीने निर्णय घेऊन बोनसचे वितरण विलंब न लावता करावे, अशी मागणी शेतकरी, विविध संघटना आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.


